अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 1 हजार 71 कोटींची मदत होणार, राज्य सरकारने दिली मान्यता

मुंबई प्रतिनिधी:- छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागात जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी शेतकऱ्यांना 1 हजार 71 लाख 77 हजार वितरित करण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. या दोन्ही विभागांतील एकूण 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ज्यात, अमरावती विभागातील एकूण 7 लाख 63 हजार 23 शेतकऱ्यांना 557 कोटी 26 लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 6 लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांना 435 कोटी 74 लाख रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत पीक नुकसानीसाठी मिळणार आहे.
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक कृषी विभागसह महसूल प्रशासनाकडून पंचनामे करून अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता या नुकसानीची भरपाईला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे देखील पाहणं महत्वाचे असणार आहे.
जून जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी मोजक्याच काही भागात झाली होती. मात्र, इतर भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे अजूनही अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरीपाचे पीकं हातून गेली असून, त्यांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात परिस्थिती गंभीर असून, अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
What's Your Reaction?






