अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला म्हणून गुन्हा दाखल केला
शहादा प्रतिनिधी;- सटाणा जिल्हा नाशिक येथे २९ जुलै २०२३ रोजी मणिपूर येथील आदिवासींवर महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चातील ४४ निरपराध आदिवासी जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांच्यामार्फत नाशिकचे पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आले.निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,मुकेश चौधरी,सुरज बिलावे,आतीश चौधरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,मणिपूर येथील २ आदिवासी महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर धिंड काढणा-या जमावातील आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी व सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडी,आदिवासी जनकल्याण पार्टी व आदिवासी संघटनांच्या वतीने सटाणा येथे मोर्चा काढण्यात आला.मोर्चाची सांगता झाल्यानंतर अज्ञात लोकांनी दोधेश्वर नाक्यावर रास्ता रोको करून एसटी व खासगी वाहनांवर दगडफेक केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.यात बिरसा फायटर्सचे सचिन सोनवणे,प्रविण पवार, विलास निकम असे काही पदाधिकारी अडकले.या प्रकरणी पोलिसांनी ४४ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली.आरोपींवर भादवि कलम ३५३,३३२,३२४,३४१,१४३,१४७,१४८,१४९,१०७,४२७,३२३ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण कायदा कलम ३,क्रिमिनल लाॅ अमेंडमेंट कायदा कलम ७ तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस कायदा कलम ३७(१)३ चे उल्लंघन, १३५ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.या प्रकरणातील आदिवासी समुदायाच्या निरपराध ४४ जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. अन्यथा आदिवासी समुदायाकडून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला आहे.
What's Your Reaction?