झाडाखाली आदिवासी महिलेची प्रसूती! आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
नंदूरबार : जिल्हा शासकीय रुग्णालय नंदूरबार जवळ डिसी टाऊन जवळ नंदूरबार जिल्ह्य़ातील एका आदिवासी महिलेची दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी प्रसुती झाली.बिरसा फायटर्सचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी व सामाजिक कार्यकर्त्या तथा आरोग्य सेविका मनिषाताई यांनी या महिलेला मदत केली.मनिषाताई यांनी प्रसुतीची प्राथमिक साहित्य झाडाखाली आणून या महिलेची सुखरूप प्रसुती केली.या महिलेने एका गोंडस व छानशा बाळाला जन्म दिला आहे.
विशेष म्हणजे नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे स्वतः डॉक्टर आहेत, विजयकुमार गावीत हे नंदूरबार तालुक्याचे डॉक्टर आमदार आहेत, नंदूरबार जिल्ह्याच्या खासदार हिना गावित ह्यासुद्धा डॉक्टर आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित ह्या सुद्धा डॉक्टर आहेत. नंदूरबार जिल्ह्य़ात मंत्री असो की आमदार, खासदार असो हे सगळेच डॉक्टर झालेले व्यक्ती आहेत. शासकीय महत्वाच्या व मोठ्या पदांवर डॉक्टर माणसे असतांना नंदूरबार शहरात एका आदिवासी महिलेची आजही झाडाखाली प्रसुती होते याला दुर्दैवच म्हणावे लागेल.
भारताला डिजीटल इंडिया बनवण्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा आताचे पुढारी करीत आहेत. परंतु आदिवासी समाज आजही शिक्षण,आरोग्य या मुलभूत सुविधांपासून दुर्लक्षित आहे.मंत्री,आमदार, खासदार, अध्यक्ष यांनी आपल्या स्वतःच्या नावासमोर डॉक्टर लावण्यासाठीच डिग्री घेतली आहे का? असा सवाल या प्रसंगी जनतेत निर्माण झाला आहे.
What's Your Reaction?