ऊसतोड कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य करा! गहिनाथ थोरे

ऊसतोड कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य करा! गहिनाथ थोरे

बीड़ (प्रतिनिधी)- ऊसतोड कामगारांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य करा  अशी मागणी आज महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकादम कामगार युनियनचे राज्य अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी आज ऊसतोड संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग आंधळे यांच्या आमरण उपोषणाला भेट देवून दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत  लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच यावेळी शिवशाहू संघटनेचे राज्यध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी शासनाने त्वरीत मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील ऊसतोड कामगार रस्त्यावर उतरेल आणि पुढची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा दिला आहे.

 यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊसतोड कामगारांचा मागण्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्या अशा की,  1. ऊसतोड कामगारांना प्रतिटन 500 रु.भाव देण्यात यावा., 2. मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी., 3. वाहतुक दाराच्या ट्रक, ट्रॅक्टरमधील दरात दुप्पट वाढ करण्यात यावी., 4. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी  कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे साखर आयुक्त व साखर संघाने करावी व विम्याची रक्कम रु.5 लाख करावी., 5. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्याच भागात निवासी आश्रम शाळा सुरु कराव्यात. 6. केंद्र सरकार कडून मुलांसाठी त्यांच्याच भागात निवासी आश्रम शाळा सुरु कराव्यात. 7.अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऊसतोडणी कामगार उन्नती प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविण्यात यावा., 8.शासनाच्या निधीतून कामगारांना घरकुल मिळावे.,9.ऊसतोडणी कामगार रहिवासाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व लाईटची व्यवस्था करण्यात यावी., 10. ऊसतोडणी कामगारांसाठी दवाखान्याची सोय शासनामार्फत कारखान्याने करावी.,11. मुकादम व कामगार यांना शासनाकडून ओळखपत्र देण्यात यावे., 12.ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळावे., 13.ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना साखर कारखान्यामध्ये नोकरी मिळावी., आदी मागण्या बाबतचे निवेदन देण्यात आले.

 तसेच महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकादम कामगार युनियनचे बीड जिल्हाध्यक्ष पांडूरंग आंधळे यांच्या ऊसतोड मजुरांच्या मागण्यांसाठीच्या आमरण उपोषणाचा 4 था दिवस असून त्यांच्याकडे अजूनही शासनाचे दुर्लक्ष आहे. जर पांडूरंग आंधळे यांचे काही शारिरीक नुकसान झाले तर त्यास शासन जबाबदार राहील त्यामुळे ऊसतोड कामगाराच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे निवेदन देण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ.संजय तांदळे, शिवशाहू ऊसतोड कामगार संघटनेचे राज्यध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, महाराष्ट्र राज्य आशावर्कर संघटनेचे राज्य अध्यक्ष सचिन आंधळे, ऊसतोड कामगार कृती समितीचे राज्य अध्यक्ष ओमप्रकाश गिरी व उपाध्यक्ष बाजीराव ढाकणे आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow