लिंबागणेश येथे सामूहिक आरती नंतर मयुरेश्वराची निघाली विसर्जन मिरवणूक

(बीड प्रतिनिधी ) एक गाव एक गणपतीची अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सरकार वाड्यात प्रतिष्ठापीत करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणेशाची शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सामुदायीक आरतींनतर विजर्सन मिरवणूकीला सुरूवात झाली. छत्री, चौरी, अब्दागिरी, ध्वज, दंड अशा राजेशाही थाटात ही मिरवणूक होती. रात्री आठ वाजता भालचंद्र गणपती मंदिराच्या परिसरातील चंद्रपुष्करणी तीर्थात या गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.
एक गाव एक गणपतीची अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या लिंबागणेश येथील सरकारवाड्यात गणेश चतुर्थी दिवशी मयुरेश्वर गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. शनिवारी दुपारी साडेबारा वाजल्यांनतर मुळ नक्षत्र लागल्यांनतर मयुरेश्वर गणेशाची सामुदायीक आरतीनंतर मुर्ती सागवानी पालखीत ठेवण्यात येवुन मोरया हो मोरयाच्या गजरात विसर्जन मिरवणूक सुरू झाली. सरकारवाड्याच्या बाहेर मिरवणूक आल्यांनतर टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळींनी ठेका धरला. तर ढोल ताशाच्या गजरात लेझीम पथकातील तरूणांनी आपले कसब दाखवले. गावातील मोराती मंदिराला प्रदक्षणा घेण्यात आल्यांनतर गावातील बाजरास्थळी बैलगाडीवर गणेश मुर्ती १२ वाड्यातील भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने या गावात यात्रेची परंपरा असुन बाजारस्थळी यात्रे बरोबरच परिसरातील १२ वाड्यातील लेझीम पथक सहभागी झाले होते. रात्री आठ वाजता पुन्हा मोरया हो मोरयाच्या गजरात या गणेशाचे भालचंद्र गणपती मंदिराच्या परिसरातील चंद्रपुष्करणी तीर्थात सामुदायीक आरतीनंतर शांततेत विजर्सन करण्यात आले.
राजकीय मातब्बरांनी घेतले दर्शन
बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,युवक नेते डॉ.योगेश क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योतीताई मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बबन गवते, , शिवसेना जिल्हाप्रमुख आनिलदादा जगताप, डॉ.बाबु जोगदंड, स्वप्निल गलधर,पवन कुचेकर यांनी लिंबागणेश येथे भेट देत मयुरेश्वर गणेशाचे मनोभावे दर्शन घेवुन पालखीला खांदा दिला.
What's Your Reaction?






