अजय बारस्कर महाराजांचा फडणवीसांच्या सागर बंगल्या समोर ठिय्या

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही, दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे हे सगे-सोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. तर, शासनस्तरावर सगेसोयरेसंदर्भाने लवकरच अंमलबजावणी होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, आरक्षणाचा हा गुंता राज्यातील सर्वात जटील प्रश्न बनला आहे. त्यातच, काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर आता बारस्कर आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपला ठिय्या घातला असून आंदोलन सुरू केल्याचं दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओसरीवर बसले होते, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीची उत्सव सुरू असतानाच दुसरीकडे आषाढीच्याच दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाल्याचं पाहायला मिळालं. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलीस घेत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने ही नेमकी जळाली की जाळली, कोणी जाळली आणि का जाळली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेतय. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ बारस्कर यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं. बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
What's Your Reaction?






