आरक्षणावर कुऱ्हाड चालवण्याचे भाजप सरकारचे आणखी एक पाऊल! राजहंस

मुंबई, प्रतिनिधी- केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे सरकार आल्यापासून संविधानातील एक-एक कलम बदलले जात आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या विचारांचे सरकार असल्याने सातत्याने आरक्षण संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठातील एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षित जागा अनारक्षित करण्याचा प्रस्ताव युजीसीने तयार केला आहे. हा प्रकार म्हणजे आरक्षणावर कुऱ्हाड चालवण्याकडे मनुवादी भाजपा सरकारने टाकलेले आणखी एक पाऊल आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते व मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
युजीसीचा हा प्रस्ताव हाणून पाडला नाहीतर विविध सरकारी विभागातील आरक्षण असलेल्या जागा अशाच पद्धतीने अनारक्षित करुन आरक्षण संपवले जाईल. एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी समाजातील लोकांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा हा कुटील डाव आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षणाची समिक्षा केली पाहिजे असे विधान मध्यंतरी केले होते. भाजपा हा आरएसएस विचारधारेचा पक्ष आहे, संघाचा व भाजपाचा आरक्षणाला असलेला विरोध काही लपून राहिलेला नाही. युजीसीचा हा प्रस्ताव दलित, आदिवासी, मागास वर्गांवर अन्याय करणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने आरक्षण दिले आहे पण संविधानावरच सातत्याने हल्ले होत आहेत हा चिंतेचा विषय आहे. युजीसीचा हा प्रस्ताव रद्द केला पाहिजे अशी मागणी सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
What's Your Reaction?






