भाजप समर्थक व विरोधी पक्षांना वेगळे कायदे आहेत का? सुरेशचंद्र राजहंस

भाजप समर्थक व विरोधी पक्षांना वेगळे कायदे आहेत का? सुरेशचंद्र राजहंस

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील कार्यक्रमात मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी "राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडील नसून मुस्लीम जमीनदार हे त्याचे खरे वडील आहेत ”असं वादग्रस्त विधान करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान केला आहे. सभांजी भिडे सारखी विकृत विचाराची व्यक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल खालच्या पातळीवर जावून टीकाटिप्पणी करते अशा मनुवादी प्रवृत्तीच्या संभाजी भिडे याच्यावर देहाद्रोहाचा गुन्हा नोंविण्यात येवून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे. 

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार हा देशाला मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे. त्यामुळे संभाजी भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल खालच्या पातळीवर जावून टीकाटिप्पणी करते ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्म समभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. पण ही ओळख पुसण्यासाठी संभाजी भिडे, शरद पोंक्षे यासारखी मनुवादी प्रवृत्तींचा प्रयत्न आहे. अशा लोकांना वेळीच आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे पण राज्यातील सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. संभाजी भिडे यांनी केलेले विधान राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग व बलिदान करणाऱ्यांचा घोर अपमान करणारे आहे. भारताच्या स्वातंत्र्यालाच नाकारणाऱ्या संभाजी भिडेंचे विधान देशद्रोही आहे, या भिडेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्यास शिंदे-फडणवीस–पवार सरकार टाळाटाळ का करत आहे? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.

संभाजी भिडे, शरद पोंक्षे यांनी केलेली विधाने अतिशय गंभीर असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे पण ही मंडळी मनुवादी व संघ विचाराची री ओढत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही उलट विरोधी पक्षांच्या लोकांना क्षुल्लक कारणावरूनही अटक केली जाते. राज्यात भाजपा विचारधारेच्या लोकांना एक कायदा व विरोधी पक्षांच्या लोकांना वेगळा कायदा आहे असे दिसते. 

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये धमक दिसत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या, स्वांतत्र्य, तिरंगा व राष्ट्रगिताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेचा व आरक्षणविषयक वादग्रस्त विधान करून समाजात जातीयवाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या शरद पोंक्षेवर राज्य सरकार तात्काळ कारवाई करेल अशी अपेक्षा करतो असे राजहंस म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow