बिंदुसरा परिसरात लावलेले एकही बांबूचे झाड अस्तित्वात नसल्याने ;वनीकरण विभागाने चौकशीचे आदेश दिले

बीड जिल्हा प्रशासनाने बिंदुसरा नदीपात्रात लावलेल्या बांबूच्या झाडापैकी एकही बांबूचे झाड अस्तित्वात नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी दिली यासंदर्भात सामाजिक वनीकरण विभाग औरंगाबाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शासनामार्फत दरवर्षी जून महिना उजाडला की वृक्षलागवडीच्या तयारीचा देखावा करत मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी खर्च करते.विविध दैनिकात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या छायाचित्रासहीत बातम्या प्रसिद्ध होतात मात्र वृक्षसंवर्धन केले जात नाही.शासकीय कार्यालयांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठरवुन दिले जाते मात्र लागवड केलेली किती वृक्ष जिवंत आहेत याचे सर्व्हेक्षण करताना दिसत नाही.दरवर्षी जुन्याच खड्ड्यात वृक्षारोपण करुन कागदोपत्री टार्गेट पुर्ण करत शासनाचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात घातला जातो.यावर्षी देखील जिल्हाप्रशासनाने १ कोटी १० लाख वृक्षरोपणाचे उद्दीष्ट ठरवुन दिले असून नेहमी प्रमाणेच हे सुद्धा कागदोपत्रीच करण्यात येईल यात शंका नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
६००० वृक्षलागवडीचा इव्हेंट बिंदुसरा धरणाच्या पायथ्याशी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केलेले रोपटे सुद्धा अस्तित्वात नाही
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा प्रशासनाने बीड शहरापासून बिंदुसरा धरणापर्यंत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठावर प्रत्येकी ८ अशी एकूण १६ किलोमीटर अंतर लांबीच्या परीसरात दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद अजित पवार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.जवळपास ६००० वृक्षलागवड केल्याचा विविध दैनिकातुन गाजावाजा करण्यात आला मात्र आज दि.७ जुन रोजी त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता एकही झाड अस्तित्वात नसुन एवढंच काय तर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले बांबुचे झाड सुद्धा अस्तित्वात नाही त्यामुळे एकंदरीत जिल्हा प्रशासन केवळ वृक्षलागवडीचा फार्स करतं परंतू वृक्षसंवर्धन करताना दिसुन येत नाही.
वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण औरंगाबाद यांचे वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात चौकशीचे आदेश
बीड जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ वनविभागाच्या विविध कामांसाठी दिलेल्या १० कोटी ८४ लाख रुपये कामात गैरव्यवहार तसेच आगीच्या घटना,पर्यावरण दिनानिमित्त ७३ लाख ३४ हजार वृक्षलागवड आदि प्रकरणात स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी.बीड जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे ऑडिट करण्यात येऊन गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर वर कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'दिमाग की बत्ती जलाओ 'आंदोलन करण्यात आले होते त्याअनुषंगाने वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद अमितकुमार मिश्रा यांनी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण बीड यांना दुसऱ्यांदा स्मरणपत्र पाठवत अद्याप अहवाल अप्राप्त असुन संबंधीत प्रकरणात चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
What's Your Reaction?






