राष्ट्रवादीचे आमदार खासदार अजित पवारांच्या बंगल्यावर

पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली. आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष देवगिरीवर दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ देखील अजित दादांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील अजितदादांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राजघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु झाली आहे. प्रश्न इतकाच आहे की जर प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांना मिळालं तर विरोधी पक्षनेते पदाचं आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचं काय?
What's Your Reaction?






