मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीवर भाजप शिंदे सरकारचा डल्ला! सुरेशचंद्र राजहंस
मुंबई प्रतिनिधी:- मुंबई महानगरपालिका ही एक श्रीमंत महानगरपालिका असून महापालिकेच्या ९२ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये आहेत. परंतु या मुदत ठेवींवर शिंदे भाजपा सरकारची वक्रदृष्टी पडली असून या मुदत ठेवीत घट होत आहे. मागील वर्षभरात या मुदत ठेवीतून ५ हजार कोटी रुपये कमी झाले आहेत. मुंबईकरांच्या कराच्या पैशातून जमा करण्यात आलेल्या या सुरक्षित मुदत ठेवींवरही शिंदे-भाजपा सरकारने डल्ला मारण्यास सुरुवात केली असून हे असेच सुरु राहिले तर संपूर्ण मुदत ठेवी सुद्धा शिंदे-भाजपा सरकार फस्त करुन टाकेल, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते व मुंबई स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ९२ हजार कोटींच्या मुदत ठेवींमधूनच आस्थापना खर्च आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जातात. महानगरपालिकेची मुदत संपून वर्ष होत आले पण महायुती सरकारची निवडणुका घेण्याची हिम्मत होत नाही. निवडणुकीत जनता पराभव करणार याची महायुतीला भिती वाटत आहे. आज महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आला असून मुंबईकरांच्या पैशांवर राजरोस दरोडा टाकला जात आहे.
पाच हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता फेब्रुवारीत महानगरपालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पासांठी १२ हजार ७७६ कोटी रुपये राखीव निधीतून काढण्यात येणार असल्याचे समजते. मुंबईकरांच्या पैशाची लुट सुरु असुन भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार मात्र या मुदतठेवी कमी होण्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आहेत. आशिष शेलार यांचा हा आरोप हास्यास्पद असून हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा आहे, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
What's Your Reaction?