नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा घरफोडी
बीड प्रतिनिधी:- बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या, मुळकवाडी येथे आज मंगळवारी भर दिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली असून, यामध्ये पावणे तीन लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील कवली वस्ती वर घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आज मंगळवारी भर दिवसा दुपारी ४ ते ६ च्या दरम्यान चोरीची घटना घडली असुन, चोरट्यांनी कपाटातील रोख २५ हजार रुपये आणि ४ तोळ्याचे मंगळसुत्र असा एकुण पावणे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. अशी माहिती संबंधित घरमालक मुरलीधर दिनानाथ ढास वय ८३ व त्यांच्या पत्नी कौशल्याबाई मुरलीधर ढास यांनी सांगितले. हे दोघेही पती-पत्नी आज दुपारी ३ वाजता बेनसुर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. सायंकाळी साडे सहा वाजता ते घरी आले असता पत्र्याच्या घराच्या दोन्ही खोल्यांचे कुलुप तुटल्याचे दिसुन आले. घरात कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. तेव्हा आपल्या घरात घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर घटना घडताच तात्काळ याची माहिती नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि विलास हजारे यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी फोनवरून घटना घडल्याची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे हवालदार डोंगरे, सातपुते आणि घुले यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा पंचनामा केला असून याचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत. मात्र नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यातच भर दिवसा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. आणि आता पुन्हा सदर घटना आज मंगळवारी भर दिवसा घडल्याने या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारावर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये सवाल उपस्थित होत आहे.
What's Your Reaction?