मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात!काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविला जात आहे. मागील ९ वर्षात भाजपा सरकार लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून राज्यकारभार करत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभागासह अनेक स्वायत्त संस्था सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असून हुकूमशाही कारभार सुरु असल्याने लोकशाही, संविधान व संवैधानिक संस्था धोक्यात आहेत, अशी टीका काँग्रेस नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
काँग्रेसने स्वातंत्र्याचा प्रदिर्घ लढा देऊन देश ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र केला व देशात लोकशाही शासन व्यवस्था रुजवली सोबतच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. संविधानाने प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले, आरक्षण देऊन वंचित, मागास समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली पण आज त्याच लोकशाही व संविधानावर घाला घातला जात आहे. आरएसएसला संविधान संपवायचे आहे, त्यांच्याच विचाराचे सरकार केंद्रात सत्तेवर आहे त्यासाठी सुनियोजित पद्धतीने हल्ला केला जात आहे. धर्म, जात, पेहराव, आहार, विचारसरणीच्या आधारे लोकां-लोकांमध्ये भेदभाव केला जात आहे. लोकांच्या मनामध्ये भय व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात असून देशातील विविधता माननाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या जुलमी, अत्याचारी सरकारच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.
मोदी सरकारच्या विरोधात उठणारा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नसून देशातील मुठभर भंडावलदारांचे सरकार आहे. आता वेळ आली आहे या भाजपा सरकार विरोधात एकत्र येण्याची. सत्य, न्याय आणि अहिंसा ही काँग्रेसची विचारधाराच देशाला तारू शकते. याच विचारधारेने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे आणि काँग्रेसचा हा विचारच केंद्रातील मोदी सरकारचाही पराभव करेल, असेही राजहंस म्हणाले.
What's Your Reaction?