काटेवाडी ग्रामस्थांची भगवानगडाला एक कोटी अकरा लक्ष रुपयाची देणगी

भगवानगड प्रतिनिधी : श्री क्षेत्र भगवानगडावरील नियोजित श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या २२ कोटी रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू झालेल्या आहेत. गडाच्या भक्तवर्गांपैकी अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर करून देणगीची रक्कम गडाचे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांकडे सुपूर्द केली आहे. देणगीचे बाकी असलेले गावकरी बाबांना सप्ताहानिमित्त किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने गावात बोलावून बाबांसमोर आपापले देणगीचे आकडे जाहीर करतात. नंतर संपूर्ण ग्रामस्थ एक विशिष्ट तारीख ठरवून बाबांना बोलावून घेतात व जाहीर केलेली देणगी बाबांकडे सुपूर्द करतात.
श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांनी श्री क्षेत्र भगवानगडावर माऊलींचे मंदिर बांधण्याचे ठरविले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरु झाला आहे. न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा हे काटेवाडी (ता.पाथर्डी, जि.नगर ) येथे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आले असता ग्रामस्थांनी गडावरील माऊलींच्या मंदिरासाठी देणगी द्यायचे ठरविले. त्यानुसार ग्रामस्थांनी आपापल्या देणगीचे आकडे जाहीर केले. जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण आकडेवारीची गोळाबेरीज ही १ कोटी ११ लक्ष रुपये झाली.
नोकरी/व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांच्या देणगीचे आकडे आणखी बाकी आहेत. एकंदरीत श्री क्षेत्र भगवानगडाचा भक्तवर्ग गडावरील माऊलींच्या मंदिराला आर्थिक स्वरुपात हातभार लावण्यासाठी सरसावलेला दिसून येत आहे. या भव्य दिव्य मंदिरासाठी लागणारा खर्च अंदाजे २२ कोटी रूपये इतका आहे. त्यामुळे या अभूतपूर्व मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






