घन लागवडीतून शेतकऱ्यांनी वाढवावे कापूस उत्पादन डॉ .मनिकंदन

बातमीदार (अंबाजोगाई) दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कापूस पीक परिसंवादाचे’ आयोजन तिगाव तालुका वडवणी येथे करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान बीड प्रकल्पाचे संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनिकंदन (वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर), डॉ. अशोक जाधव (सहयोगी संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी) उपस्थित होते. मंचावर डॉ. वसंत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई), कृष्णा कर्डिले (शास्त्रज्ञ पिकविद्या), नरेंद्र जोशी (शास्त्रज्ञ उद्यानविद्या), डॉ. प्रदीप सांगळे (शास्त्रज्ञ पीक संरक्षण), कृषी विभाग, आत्मा, राशी सीड्स, महिको सीड्स व नुजीविडू सीड्स चे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.
परिसंवादाचे प्रास्ताविक करताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिके दरवर्षी राबविण्यात येतात. तंत्रज्ञान वापरामुळे कापूस पिकाची उत्पादकता वाढली असल्याचे केंद्राच्या लक्षात आले आहे. उत्पादकता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्र शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पीक प्रात्यक्षिक व विस्तार कार्यक्रमावर भर देत आहे. विविध विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो. आजच्या परिसंवादातून कापूस पिकाचे सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मनिकंदन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कापूस पिकामध्ये झाडाची गळफांदी व फळफांदी ओळखून छाटणी तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. कापसामध्ये घनलागवड केल्यास एकरी उत्पादनात वाढ होते. अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे बोरेक्स, गंधक, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट योग्य प्रमाणात पिकाला उपलब्ध करून द्यावे. कापूस बोंड व्यवस्थापन करताना बोंडसड होऊ नये म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करावी. एक आड एक पाने काढावीत असे त्यांनी सांगितले.
डॉ. अशोक जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, परभणी कृषी विद्यापीठाने 20 एकर क्षेत्रावर प्रयोग घेतला आहे. त्यामध्ये गळफांदी छाटणी तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणी, तंत्रज्ञान याचा अवलंब करून विद्यापीठ शिफारसी देत आहे. कापूस लागवड तंत्रज्ञानात बदल करून एकरी उत्पादन वाढवणे शक्य आहे. केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सांगळे यांनी कापसातील कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रल्हाद गवारे (संचालक विधाका शेतकरी उत्पादक कंपनी) यांनी कंपनीच्या कार्याची माहिती दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कापसाची उत्पादकता वाढविणे सोबतच उत्पादन खर्च कमी करून उच्च दर्जाचा कापूस पिकवणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून वडवणी तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कर्डिले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिगाव येथील गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
What's Your Reaction?






