50 टक्के निधी राज्याच्या विकासासाठी द्या प्रा. वर्षा गायकवाड

महाराष्ट्रातून संकलित केलेल्या करातील ५० टक्के निधी राज्याच्या विकासासाठी द्या - प्रा. वर्षा गायकवाड
एनडीए सरकारने मुंबई लोकलचे वाढते अपघात थांबवण्यासाठी काय पावले उचलली ?
अरबी समुद्रातील शिवस्मारक व इंदू मीलमधील बाबासाहेबांचे स्मारक कधी पूर्ण होणार.*
नवी दिल्ली/मुंबई , दि. २ जुलै
महाराष्ट्र राज्य केंद्राला सर्वाधिक महसूल देते परंतु महाराष्ट्रातून कराच्या स्वरूपात संकलित केलेल्या प्रत्येक रुपयामागे महाराष्ट्राला फक्त ७ पैसे मिळतात. टॅक्स डिव्हॅल्युएशन मध्ये महाराष्ट्राचा वाटा वाढवून दिलाच पाहिजे अशी आग्रही मागणी करत महाराष्ट्रातून संकलित केलेल्या करांच्या निधी पैकी ५० टक्के निधी राज्याच्या विकासासाठी परत दिला गेला पाहिजे असे खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू -फुले -आंबेडकर- सावित्रीमाई यांचे पुरोगामी विचार आणि परंपरा यांचे स्मरण करून गायकवाड पुढे म्हणाल्या की, एनडीए सरकारने महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुद्धा स्वतःची पाठ थोपटून घेण्याची संधी म्हणून घेतले आहे.
या अभिभाषणात 'म' वरून महागाई, 'म' वरून मणिपूर या विषयांवर काहीही भाष्य केले गेले नाही. 'म' वरून महिलांच्या सुरक्षेचा बाबतीत स्वतःची खोटी वाहवाही करून घेणाऱ्या या सरकारने सांगावे की, महिला खेळाडूंनी ज्या ब्रिजभूषण सिंह च्या दुषकृत्यांना सर्वांसमोर उघड केले, त्यांना न्याय का मिळाला नाही?
NCRB च्या अहवालानुसार २०१७ ते २०२१ यादरम्यान रेल्वे अपघातात तब्बल १००,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनच्या अपघातात दररोज ७ जणांना जीव गमवावा लागतो. जर लोकल सेवा खोळंबल्या तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा कारभार सुद्धा खोळंबतो. रेल्वेचे वाढते अपघात आणि ते थांबवण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याचा अभिभाषणात साधा उल्लेख ही नाही.
'म' वरून महाराष्ट्र आणि मुंबई...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची पायाभरणी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली, मात्र तेथे अद्याप काम सुरू झालेले नाही. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. आमच्या आराध्य दैवतांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
सुरेशचंद्र राजहंस, (प्रवक्ते आणि मिडिया समन्वयक, मुंबई काँग्रेस)
What's Your Reaction?






