साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा !काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

अण्णाभाऊ साठेंच्या मुंबईतील स्मारकाला मुहूर्त कधी लागणार ? काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महानसमाजसुधारकाचे स्मारक व्हावे ही मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. जयंती व पुण्यतिथीला अण्णाभाऊंच्या कार्याची आठवण करत स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या जातात पण या घोषणा पुन्हा हवेतच विरतात. आतातरी सरकारने अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
समाजातील वंचित, शोषितांसाठी आवाज उठवलेल्या थोर समाजसुधारक अण्णा भाऊ साठे यांचे कार्य मोठे आहे. मुंबईत अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य घाटकोपरमधील चिरागनगर झोपडपट्टीत होते. या चिरागनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना अण्णा भाऊ साठे यांच्या घराचे जतन करून तेथे त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची संकल्पना २०१९ मध्ये पुढे आली होती. या प्रकल्पाचा आराखडाही तयार करण्यात आला व सरकारने त्या आरखड्याला मंजुरीही दिली पण अजूनही या स्मारकाचा प्रवास पुढे झालेला नाही. हे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास यावे अशी समाजाची मागणी आहे. या मागणीचा सरकारने विचार करुन स्मारकाचे कार्य पूर्ण करावे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नायक अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव जगभर केला जातो. रशियानेही अण्णा भाऊंच्या कार्याची दखल घेत मास्को शहरात पुतळा उभारला, लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून त्याचे श्रेय लाटण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात पण अण्णांच्या जन्मभूमीत, महाराष्ट्रात भाजपा सरकारच्या काळात मात्र त्यांची उपेक्षा होत असल्याचे दिसत आहे.
रशियाची राजधानी मास्को मध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवून त्यांच्या कार्याचा गौरव करत असल्याबद्दल राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मास्कोतील स्थानिक संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी राज्य सरकारने अजूनही ठराव करुन केंद्र सरकारला पाठवलेला नाही. परंतु ,
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करावे ही मागणीही केली जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राला शिफारस करावी यासाठी राज्यातील आमदारांनी सह्यांचे पत्रही पाठवले आहे पण सरकारने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे व भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करावे या समाजाच्या मागण्यांचा भाजपा सरकारने गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी राजहंस यांनी केली आहे.
What's Your Reaction?






