मुस्लिम आरक्षणासंदर्भात इलियास इनामदार यांचा अजित पवारांवर आरोप
बीड प्रतिनिधी: देशात व राज्यात मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या परिस्थितीवर अनेक कमिशन नेमण्यात आली. प्रत्येक कमिशनने वेळोवेळी मुस्लिम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अहवाल सादर केला. सदरील अहवालामध्ये मुस्लिम समाजाची अवस्था अतिशय बिकट असून मागास प्रवर्गापेक्षाही खालच्या दर्जाचे असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झालेले आहे. परंतु सदर अहवाल हे केवळ कागदोपत्री राहिले असून शासन दरबारी मात्र आरक्षणाच्या दृष्टीने अनास्था दिसून येत आहे. महाराष्ट्रात मागील आघाडी सरकारने मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण हे पण निवडणूकीचा गाजर म्हणून जाहिर केले होते पुढे त्याचे काय झाले आपण सर्वांना माहित आहे, फडणवीस म्हणतात मुस्लिम आरक्षण धर्माच्या आधारावर देता येत नाही मग फडणवीस यांच्या युती सरकार मध्ये उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार पण राज्यातील मुस्लिम समाजाला आरक्षण बैठक घेवून निवडणूकीचा गाजर तर दाखवत नाही ना? असा प्रश्न मुस्लिम समाजाच्या मनात येत आहे कारण अजित पवार यांना मुस्लिम आरक्षण निर्णय घेत असताना फडणवीस व युती सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि सर्वांना माहित आहे राज्यात व देशात भाजपाचा मुस्लिम विरोधी एजंडा काय आहे, मुस्लिम समाजातील जुम्मन नेत्यांना खुश करुन निवडणूकीत मुस्लिम समाजाची मते तर आपल्या पदरात पाडून घेण्याचा डाव तर पवार यांचा नाही ना? असा थेट प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे केला आहे.
What's Your Reaction?