मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिले पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभाग तसेच मुसळधार पाऊस झालेल्या क्षेत्रातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भागातील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीचेदेखील पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्तीकाळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
What's Your Reaction?






