जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र

रामनवमी मिरवणूक वेळी झालेला वाद, नगर शेवगाव येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील वाद, त्र्यंबकेश्वर येथे मंदिरासमोरील संदल प्रथेवरून वाद, संगमनेर येथील लव्ह जिहाद विरुद्ध निघालेल्या मोच्यानंतर समनापूर गावात झालेली दगडफेक या अलीकडील काळात घडलेल्या घटना पाहता यामागे विशिष्ट विचार धारेचे लोक कार्यरत असल्याचे लक्षात येत आहे.यामागे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम जाणीवपूर्वक करण्याचा डाव असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे,
असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषनावह नाही.त्याचप्रमाणे मुंबई, चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात घडलेली विद्यार्थिनीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या घटनांची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करून सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल. आपण ह्या घडत असलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निदेश संबंधितांना द्याल अशी मला आशा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?






