छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मटण कमी वाढले म्हणून मित्राची हत्या केली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केवळ मटन कमी वाढल्याने एका मित्राने दुसर्या मित्राची थेट हत्याच केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पार्टी करताना जरा जपून असे म्हणायची […]
हल्ली माणसांना कुठल्या कारणावरून राग अनावर होईल हे सांगणे अवघड झाले आहे. छोट्या छोट्या कारणावरून देखील लोक एकमेकांचे मुडदे पाडायला निघाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केवळ मटनाचे पीस कमी वाढल्याने एका मित्राने दुसर्या मित्राची थेट हत्याच केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पार्टी करताना जरा जपून असे म्हणायची वेळ आता आली आहे.
जितेंद्र काशीराम धुरवे (वय 34 वर्षे, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी- ठाकूर (वय 35 वर्षे, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणार्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजय जगदीश रघुवंशी हे दोघे मित्र आहेत. दोघेही सिल्लोड तालुक्यातील धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मोलमजुरीसाठी आले होते. त्यामुळे शेतात लावलेल्या मिरचीची राखण करणे व इतर कामे करण्यासाठी त्यांना शेतात सालदार म्हणून ठेवण्यात आले होते. दरम्यान या दोघांनी सोमवारी रात्री मटणाची पार्टी केली. मात्र, मटणाचे पिस कमी जास्त घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी समजूत घालून तो सोडविला. त्यानंतर दोघेही शेतकरी घरी गेले.
स्थानिक शेतकर्यांनी त्यांचा वाद सोडवून घरी गेल्यावर, रात्री 11 वाजेदरम्यान पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी ओमजयने जितेंद्रचे हातपाय तोडून त्याचा खून केला व शेजारी शेतात झोपून राहिला. सकाळी दूध काढण्यासाठी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे शेतात आले असता, त्यांना जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी झोपलेल्या आरोपी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खुनाचा गुन्हा दाखल
दरम्यान शेतकरी सोनवणे यांनी सिल्लोड पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोनि. सीताराम म्हेत्रे यांनी पथकासह धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच आरोपी ओमजयला अटक करण्यात आली. तर पोलिसांनी मयत व आरोपींच्या कुटुंबीयांना माहिती दिली. रात्री उशिरा त्यांचे नातेवाईक सिल्लोड येथे हजर झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?