मनाला समाधान वाटेल अशा प्रकारे माधुरी पवारने केला तिचा वाढदिवस साजरा

आयुष्याची सुरुवात होते तो दिवस म्हणजे वाढदिवस आणि वाढदिवस हा प्रत्येकासाठी विशेष असतो, त्या दिवसाचा आनंद कसा लुटायचा याचा विचार प्रत्येकजणच करत असतो. आज २१ मार्चला अभिनेत्री माधुरी पवारने तिचा विशेष दिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आणि आजच्या या दिवसामुळे ती स्वत:ला खूप भाग्यवान मानत आहे.
अभिनेत्री माधुरी पवारने सातारा येथील आशाभवन मतिमंद मुलांच्या शाळेला भेट देऊन तिचा वाढदिवस साजरा केला. शाळेतील मुलांना शाळेत लागणा-या वस्तूंचे वाटप देखील केले. याप्रसंगी माधुरी जास्तच भावूक झाली. कारण आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण कधीच पूर्णपणे समाधानी नसतो किंवा छोट्याशा गोष्टीची किती मोठी किंमत असते हे आपल्याला नाही जाणवत पण आशाभवन शाळेला भेट दिल्यावर तिला जाणवलं की, सर्वात कमनशिबी तर आपण आहोत, येथील सर्वजण मनापासून छोट्या-मोठ्या गोष्टींचा आनंद लुटत आहेत.
या अनुभवाबद्दल व्यक्त होताना माधुरीने सांगितले की, “वाढदिवस म्हणजे हा असा दिवस ज्या दिवशी आयुष्याची सुरुवात केली जाते नवीन प्रकारे. अशा निस्वार्थी निखळ मुलांमध्ये, स्त्रियांमध्ये अशा वातावरणात वाढदिवस साजरा करून मला परत एकदा नवीन ऊर्जा मिळाली. खारीचा वाटा इतका का होईना पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंद देण्याचा योग माझ्या आयुष्यात आला तोही माझ्या वाढदिवसानिमित्ताने आणि मला ही कल्पना सुचवली त्यासाठी परमेश्वराचे खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांचे खूप आभार आज त्यांच्यामुळे ‘माधुरी पवार’ हे नाव, हा ब्रँड तयार झाला त्या नावाखाली खूप चांगल्या गोष्टी करता येतायत, प्रेक्षकांनी असंच प्रेम माझ्यावरती ठेवावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसासाठी तुम्ही दिलेल्या वेगवेगळ्या शुभेच्छांसाठी देखील मनापासून धन्यवाद.”
माधुरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या निरागस मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरले गेले ही भावना प्रत्येक माधुरीच्या फॅन्सच्या मनात येणार आणि माधुरीने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली असं म्हणू शकतो. या सर्व सेलिब्रेशनचं श्रेय आयोजक ‘माधुरी ताई पवार फॅनक्लब सातारा’ यांना जातं, कारण त्यांनी माधुरीची ही अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सत्यात उतरवली.
What's Your Reaction?






