मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केले असे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केले असे आवाहन

जालना प्रतिनिधी:- निजामकाळात ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय जाहीर केला होता. परंतु, या शासन निर्णयातील वंशावळी हा शब्द हटवून तिथे सरसकट या शब्दाची दुरुस्ती मनोज जरांगे पाटलांनी सुचवली होती. या मागणीवर चर्चा करण्याकरता काल (८ सप्टेंबर) सरकार आणि मराठा आंदोलनातील शिष्टमंडळामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांसाठी एक बंद लिफाफा अर्जुन खोतकर यांच्याकडे पाठवला. हा बंद लिफाफा मनोज जरांगे पाटलांना मिळाला, परंतु, तरीही त्यांनी उपोषण मागे घेतलेलं नाही. ते उपोषणावर ठाम असून माझ्या शब्दापुढे कोणी जाऊ नये असं आवाहनही त्यांनी मराठा सममाजातील लोकांना केलं आहे.

मनोज जरांगे पाटलांसाठी पाठवलेला बंद लिफाफा त्यांनी आज कॅमेऱ्यासमोरच उघडून पाहिला. या लिफाफ्यातील अहवालाचे सार्वजनिक वाचन केले. परंतु, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुचवलेली दुरुस्ती या बंद लिफाफ्यातील अहवालात नव्हती. त्यामुळे सरकार जोवर आमची मागणी मान्य करत नाही, सरकारकडून जोवर जीआरमध्ये दुरुस्ती होत नाही, जोवर मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील नागरिकांनाही आवाहन केलं आहे.

आपल्या ठरल्याप्रमाणे सरकारने जीआर आणला तर उद्या सकाळी सूर्य उगवण्याआधी पाणी पिणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “हे आमरण उपोषण सुरूच राहिल, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा लढा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेने आंदोलन करावं, माझ्या शब्दाच्या पुढे मराठा समाजाने जाऊ नये. मी तुमच्यापेक्षा मोठा नाही पण मुलगा म्हणून ऐका, कारण आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपण खांद्यावर घेतली आहे”, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow