आजपासून कांदा खरेदीला सुरुवात

आजपासून कांदा खरेदीला सुरुवात

केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार आहे. दरम्यान, या कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात होणार आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरुन हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आज 12 वाजल्यापासून सुरू करण्यात येत असल्याचे गोयल म्हणाले. कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानंतर आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. 

आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही पियूष गोयल यांना फोन आले. त्यांनी देखील राज्यातील कांदा नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केला जावा, याबाबत आग्रही विनंती केली, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow