विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय

मुंबई प्रतिनिधी : वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल 5 वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, 2014 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी, गावकी-भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, 2019 च्या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळे, आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने 10 वर्षानंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबीयांसह विजयाचा गुलाल उधळला.
विधानपरिषद निवडणुकींचा निकाल हाती आला असून भाजप नेत्या पंकजा मुंडेचा विजय झाला आहे. पंकजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचं कुटुंब विधानभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, या विजयानंतर पकंजा मुंडेंच्या समर्थकांनी जल्लोष केला असून विधिमंडळ परिसरात मुंडे कुटुंबीयही आनंदी असल्याचं दिसून आलं.
बीड जिल्हा हा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला राहिला आहे, अगदी सायकलवर फिरुन प्रचार करण्यापासून गोपीनाथ मुंडेंनी बीड जिल्ह्यात कमळ खुलवलं. परळी मतदारसंघातून ते राज्याच्या विधानसभेत पोहोचले. राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले. मात्र, 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांची कन्या पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे, नाराज झालेल्या पुतण्या धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. मात्र, मुंडे कुटुंबातील भावकीच्या सुप्त संघर्षाला येथूनच सुरुवात झाली. या संघर्षातूनच धनंजय मुंडेंनी 2013 साली राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली, त्यामध्ये पंकजा यांनी 24 हजार मतांनी बाजी मारली.
What's Your Reaction?






