बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा पवन कुचेकर
(बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात सलग 25 दिवसांहून अधिक काळ समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. खरीपाची पीके पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशा संकटात त्यांना आधार देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून विमा कंपनीस बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना पीक विमा मंजूर करून, तात्काळ अग्रीम रक्कम देण्यास आदेशित करावे अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या जून महिन्यापासूनच बीड जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. सुरूवातीला पाऊस नव्हता म्हणून पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग 25 दिवसांहून अधिक काळ उघडीप दिली. तसेच 24 जूलै ते 26 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात कुठेच म्हणावा तसा पाऊस पडला नाही. परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के एवढाच पाऊस झाला, सर्वांत कमी 29 टक्के पाऊस परळी तालुक्यात नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात 51 हजार 835 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. पण, पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद, बाजरी ही पीके हातची गेली आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हा पुरता धास्तावला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने पाऊले उचलावित आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीक विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या भागात पावसाचा सलग 21 दिवस खंड असेल तर पीक विम्याची भरपाई म्हणून शेतकर्यांना ऍडव्हान्स (अग्रीम) रक्कम देण्याची तरतूद आहे, पाऊस नसल्याने सर्व पीके हातची गेली आहेत, त्यामुळे शेतकरी बांधव हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत, तरी त्यांना आधार देण्याची आज खरी गरज आहे. विमा कंपनीने आता कशाचीही वाट न पाहता शेतकर्यांना पीक विमा मंजूर करावा आणि तात्काळ अग्रीम रक्कम वाटप करावी तसेच राज्य सरकार व कृषी खात्याने विमा कंपनीला तसे आदेशित करावे अशी जाहीर मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
What's Your Reaction?