पोखरी घाट शाळेला शिक्षक मिळेनात, ग्रामस्थ आक्रमक

बीड प्रतिनिधी : तब्बल ५५ लाख रुपये खर्चून ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली ; आता शिक्षकांची सोय पण आम्हीच करायची का? असा संतप्त सवाल बीड तालुक्यातील पोखरी (घाट) ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील ऊसतोड मजूर, शेतमजुर ग्रामस्थांनी आपल्या हातातील कोयता मुलांच्या हाती पडु नये म्हणून लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कष्टाच्या पैशातुन लोकवर्गणीतून तब्बल ५५ लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळेसाठी टोलेजंग इमारत बांधली.मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन वारंवार लेखी निवेदनाद्वारे शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली आता शिक्षक सुद्धा आम्हीच द्यायचे का?? असा संतप्त सवाल पोखरी (घाट) ग्रामस्थांनी केला आहे.
शिक्षक मिळाले नाहीतर शिक्षणाधिका-यांच्या कार्यालयात शाळा भरवणार:- बिभीषण मुळीक ( सरपंच पोखरी (घाट)
पोखरी (घाट) येथे जिल्हा परीषदेची १ ली ते ८ वी पर्यंत शाळा आहे.विद्यार्थी पटसंख्या १५९ आहे.शाळेत फक्त ५ शिक्षक आहेत. शिक्षण विभागाला वारंवार विनंती करूनही शिक्षक मिळत नाही त्यामुळे अखेर शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यास शाळेला कुलूप लाऊन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात शाळा भरवु असे लेखी निवेदन महिनाभरापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड, गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
ऊसतोडुन शाळा बांधली आता शिक्षक पण आम्हीच द्यायचे का?? :- सविता फाळके
गावातील ऊसतोड मजूर, शेतमजूर, शेतकरी यांनी लोकवर्गणीतून तब्बल ५५ लाख रुपये खर्चून शाळा बांधली पण शाळेत शिक्षक कमी पडत असल्याने लेकरांचं नुकसान होतंय,शाळा गाववाल्यांनी बांधली आता शिक्षक पण आम्हीच द्यायचे का?? असा संतप्त सवाल सविता शहाजी फाळके यांनी केला आहे.
शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान:- डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३५० शाळांमधील ५९२ वर्गखोल्या धोकादायक आहेत तर २०५ वस्तीशाळा ईमारतीविना किरायाने, समाज मंदिरात, पारावर, झाडाखाली तर जनावरांच्या गोठ्यात भरतात.धारूर तालुक्यातील २५ शाळांमध्ये मुलांना शिकवायला शिक्षकच नाहीत तर गेवराई तालुक्यातील पौळाची वाडी येथील ग्रामस्थांनी शिक्षकांची मागणी करत शाळेला कुलूप ठोकले.तर काही ग्रामस्थांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवण्याचा लेखी इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.मात्र शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
What's Your Reaction?






