शाहिद ताकतोडेंच्या कुटुंबाची सरकारकडून फसवणूक !काँग्रेस प्रवक्ते सुरेश राजहंस

मुंबई प्रतिनिधी - मातंग समाज आरक्षण वर्गीकरण आंदोलनातील शहीद संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाची राज्य सरकारने घोर फसवणूक केली आहे. बीड जिल्ह्यातील साळेगावच्या संजय ताकतोडे यांनी २०१९ साली मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने ताकतोडे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये देण्याचे पत्र दिले होते. पण राज्यातील भाजपाप्रणित सरकारने आता केवळ २ लाख रुपयांवरच या कुटुंबाची बोळवण करुन घोर फसवणूक केली आहे, असे आरक्षण वर्गीकरण आंदोलनाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले आहे.
अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी झाली पाहिजे व समाजाच्या इतर मागण्यासाठी संजय ताकतोडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या घटनेनंतर राज्यभर मातंग समाजाने तीव्र असंतोष व्यक्त करत तीन दिवस मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच संजय ताकतोडे यांच्यावर ही वेळ आली. आरक्षण देण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार समाजाची दिशाभूल करत आहे. आरक्षण मिळावे म्हणून आरक्षण वर्गीकरण आंदोलन व मातंग समाजाच्या वतीने लढा दिला जात आहे पण सरकार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारच्या या उदासिन धोरणांमुळेच संजय ताकतोडे यांचा बळी गेला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने २ लाख रुपये देण्याचे पत्र दिले होते, त्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयानेही मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून १० लाख रुपये मदतीचे पत्र दिले होते. २०१९ च्या या घटनेची सरकारी मदत ५ सप्टेंबर २०२३ रोजी मंजूर करुन केवळ २ लाख रुपये दिले आहेत. मराठा आरक्षण शहीदांना सरकारने तात्काळ दहा लाख रुपये मदत व एसटी महामंडळात नोकरी दिली परंतु मातंग समाजाच्या बाबतीत सरकार वेगळी भूमिका घेत आहे. त्यामुळे सरकारने ताकतोडे कुटुंबाला न्याय द्यावा कारण ही तुटपुंजी मदत असून यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ताकमोडे यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांचीच मदत व त्यांच्या वारसाला एसटी महामंडळात नोकरी द्यावी. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणात लक्ष घालून संजय ताकमोडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
What's Your Reaction?






