जावयाने केली धारधार शस्त्राने पत्नी, मेहुणा, आजे सासूची हत्या

जावयाने केली धारधार शस्त्राने पत्नी, मेहुणा, आजे सासूची हत्या

 अहमदनगर प्रतिनिधी:- शिर्डीत एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेने शिर्डी हादरले आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात हे हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काल मध्यरात्री सुमारास हा प्रकार घडला आहे. रागाच्या भरात आरोपी सुरेश निकमने घरात घुसून वार केले. त्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू जागीच ठार झाल्या. यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाली. जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पत्नीचे नाव वर्षा सुरेश निकम ( वय 24 वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड ( 25 वर्षे) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड ( 70 वर्षे) अशी मृत व्यक्तीचे नाव आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow