राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा संविधान व लोकशाहीचा विजय! काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक असून हा निकाल संविधान व लोकशाहीचा विजय आहे, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता तडकाफडकी राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुलजी गांधी यांना दिल्लीतील सरकारी घरही खाली करायला लावले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे लोकशाही व संविधानाला जुमानत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. देशात लोकशाही व्यवस्था राहिलेली नसून जनतेचे प्रश्न सरकारला विचारले म्हणून राजकीय सुडबुद्धीने मोदी सरकारने राहुलजी गांधी यांच्यावर कारवाई केली होती. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना भित नाही. लोकशाही व संविधान अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहिल.
देशहितासाठी रस्त्यापासून संसदेपर्यंत सातत्याने लढा देत लोकशाही वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहुलजी गांधी निर्भिडपणे करत आहेत. मोदी सरकारच्या या षडयंत्रानंतरही हा लढा थांबणार नाही, हा लढा राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणखी मोठया ताकतीने लढेल असेही राजहंस म्हणाले.
What's Your Reaction?