⛈️⛈️प्रतीक्षा संपली! पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

--------------------------------------------
पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह आनंदाची बातमी आहे. मान्सूनची (Monsoon Update) प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे उकाड्यापासूनही लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये (Kerala Rain Update) उद्या मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
*केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती*
एकीकडे 'बिपरजॉय' चक्रीवादळ तीव्र होत असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे की, केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे 9 जूनपासून केरळमध्ये मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी केरळमध्ये पाऊस दाखल होत असतो. पण यंदा पाऊस लांबला आहे.
पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार
भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी सांगितल होतं की, 'येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.' भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, ''बिपरजॉय चक्रीवादळाचं रुपांतर वेगाने तीव्र चक्रीवादळात होत आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.''
*बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी*
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्वीपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर, 12 जूनच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
*मान्सूनपूर्व काळात चक्रीवादळांची तीव्रता वाढली*
एका रिपोर्टनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळांची तीव्रता मान्सूननंतरच्या काळात सुमारे 20 टक्के आणि मान्सूनपूर्व काळात 40 टक्क्यांनी वाढली आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळांची तीव्रता वाढत असून हवामान बदलामुळे ते दीर्घकाळ सक्रिय राहू शकतात, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
What's Your Reaction?






