उद्यापासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्यापासून ( 5 जुलै) पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत एमजेओ व मान्सुनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. गेल्या 10 दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगांव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगांव देवळा तालुक्यात अजुनही कायम आहे. परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासुन या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणल्यातून मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्याचे खुळे म्हणाले.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात उद्या शुक्रवार दिनांक 5 जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
मराठवाड्यात उद्यापासून 10 जुलैपर्यंतच्या पाच दिवसात मात्र जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव लातूर जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यात किरकोळच पावसाचीच शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
कोकणसह विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्याच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तिथे जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसात ह्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरवातही होवु शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
What's Your Reaction?