रुग्णालयात येणाऱ्यांची त्या ठोक्यापासून सुटका
जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात येणारे रुग्ण व नातेवाईकांच्या डोक्याला बसणाऱ्या ठोक्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या कल्पकतेमुळे सुटका झाल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, जिल्हा रुग्णालयाच्या आंतररूग्ण विभागात कक्ष क्रमांक २ समोरून अतिदक्षता विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर जुन्या इमारतीचे आडवे बिम जेमतेम साडेपाच फुटाच्या उंचीवर असल्याने गडबडीत असलेले रुग्ण व नातेवाईकांचे डोके या बिमवर हमखास आदळायचे. ज्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होण्याअगोदरच रुग्ण किंवा नातेवाईकांना या बिमचे ठोके सहन करावे लागायचे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात जैसे थे प्रमाणे सुरू होता. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक पदी आल्यापासून डॉ. सुरेश साबळे यांनी आपल्यातील कर्तव्यदक्षता, जागरूकता व वेगळेपणा दाखवून दिल्याने जिल्हा रुग्णालयातील अनेक आवश्यक मात्र रेंगाळलेली कामे एकेक करत मार्गी तर लागत आहेतच शिवाय यामुळे रुग्णांना उपचार चांगले मिळत असून रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास कमी होत आहे. अशाच प्रकारे कक्ष क्रमांक २ समोरून अतिदक्षता विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या आडव्या बिमच्या ठोक्याकडे डॉ. साबळे यांची नजर गेली नसती तरच नवल. त्यांची या ठोक्याकडे नजर पडताच त्यांनी या बिमला स्पंज व रेग्झिनचे आवरण चढवून घेतले. एवढ्यावरच न थांबता याकडे लांबूनच रुग्ण व नातेवाईकांची नजर जावी म्हणून काळ्या रेक्झीनवर पिवळी पाटी लावून त्यावर "कृपया येथून चालताना आपले डोके सांभाळा" अशी सूचनाही लिहून लावली. यामुळे आता या ठोक्यापासून रुग्ण व नातेवाईकांची सुटका झाल्याने रुग्ण व नातेवाईक डॉ. साबळे यांचे आभार मानत असून एक कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अशा छोट्या दिसणाऱ्या परंतु मोठा त्रास देणाऱ्या बाबींकडेही ते लक्ष देऊन काम करीत असल्याने त्यांचे कौतुक ही केले जात आहे. यामुळे त्यांना रुग्ण व नातेवाईकांनी गोरगरिबांचे आरोग्यदाते हे संबोधन बहाल केले असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
Files
What's Your Reaction?