मी भाजपात जाणार म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत : शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी:- मी भाजपमध्ये जाणार, असे म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनातच फिरत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपला लगावला.
लोक जागा दाखवतील, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल, यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसाव्यात; अन्यथा दुसरे काय कारण असावे? असा खोचक सवालही त्यांनी केला. मुश्रीफांवर 'ईडी'ची कारवाई सुरू होती. ती थांबली, त्यांनी कोणाशी संवाद साधला माहीत नाही, असेही पवार यांनी सांगितले.
सर्व जिल्ह्यांत जाऊन आम्ही आमचे म्हणणे मांडत आहोत. त्याला लोकांचे समर्थन मिळत आहे, त्याचवेळी भाजप आणि भाजपला पाठिंबा देणार्यांविषयी तरुण, ज्येष्ठ लोकांत नाराजी दिसत आहे. असे सांगत पवार म्हणाले, देशाच्या प्रश्नांवर संवाद महत्त्वाचा असतो. मात्र, पंतप्रधान कोणाशी संवाद करत नाहीत, विरोधक म्हणून आमच्याशी तर नाहीच नाही. महत्त्वाच्या प्रश्नावर कधी बैठक बोलवत नाहीत. मतभिन्नता असली तरी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. मणिपूरच्या प्रश्नाकडे पंतप्रधानांनी कसे बघितले हे सर्वांना माहीत आहे. ईशान्येकडील या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. यामुळे या राज्यातील शांतता अस्थिर होणे हे देशाच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने चिंताजनक आहे. लोकसभा निवडणुका होतील. मात्र, मोदी यांना बाकीच्या निवडणुकांशी काहीही देणेघेणे नाही, असेही त्यांनी सांगितले.
तुमचा विचार सोडा, आमच्यात या, पक्ष फोडा हेच सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे. असा आरोप करत पवार म्हणाले, काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट नाही. आमदार म्हणजे पक्ष नव्हे. जे पक्ष सोडून गेले, त्यांच्यावर टीका करून त्यांचे महत्त्व वाढवणार नाही. जे या लोकांनी केले ते आपल्याला मान्य नाहीच. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत, आम्हीच पक्षाचे धोरण ठरवणार, भूमिका मांडणार. पक्षाविषयी अन्य कोणी बोलत असेल तर त्याला काय करावे, असे सांगत अजित पवार यांच्यावर पुन्हा प्रश्न विचारू नका, उत्तर देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला नवनेतृत्व गाव, तालुका पातळीवर तयार करायचे आहे. यामुळे तरुण वर्गाला संधी देण्याबाबत चर्चा होईल, तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






