लोकशाहीच्या माध्यमातून मतदारांनी दहशत संपवावी!
आष्टी प्रतिनिधी: लोकशाहीच्या माध्यमातून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील दहशत संपवण्याचे काम मतदारांनी करावे असे आवाहन माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी दौलावडगांव येथे केले. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे प्रचाराच्या समारोपाची कॉर्नर सभा झाली या प्रसंगी साहेबराव म्हस्के बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे, परसराम कदम बाबासाहेब काळभोर, अर्जुन मगर, आजिनाथ अडबल्ले, नंदकुमार फसले, विजय चव्हाण, दिनकर जाधव, माणिक मराठे, अरुण क्षेत्रे,माजी सरपंच नारायणराव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की,भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावान लोकांना किंमत राहिली नाही. आ. पंकजाताई मुंडे यांना लोकसभेला उमेदवारी देऊन त्यांचाच पराभव केला. यावर पक्षश्रेष्ठींनी काही दखल घेतली नाही. मुंडे घराण्याला संपवण्याचा हा नियोजित कट आहे असा आरोप म्हस्के यांनी केला. आ. पंकजाताई मुंडे यांना ना विलाजास्तव आष्टी मतदारसंघात प्रचार सभेस यावे लागले आहे. तरी त्यांनी योग्य माणसाला मतदान करण्याचे आवाहन केले. विरोधक माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत ते योग्य नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सत्य मार्गाने चालण्याचा संदेश दिला होता तीच परंपरा आ. पंकजाताई मुंडे यांनी चालविली आहे. काही लोकांनी निर्माण केलेली दहशत नष्ट करायची वेळ आली आहे. त्यांनी जलजिवन योजना असो किंवा इतर वेगवेगळ्या कामांत मोठा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप साहेबराव म्हस्के यांनी केला. मा. आ.भीमराव धोंडे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत कोणताही मोठा नेता प्रचाराला आला नाही. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. कार्यकर्त्यांनी आपसात वाद न घालता व्यवस्थित मतदान करून घ्यावे. ही निवडणूक म्हणजे आरपारची लढाई आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे पाच वर्षे आमदार असताना कुठेही भांडणे झाली नाहीत, उलट झालेले वाद मिटवण्याचे काम त्यांनी केले. याप्रसंगी अनेक युवकांनी धोंडे गटात प्रवेश केला.
याप्रसंगी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मतदारसंघातील दहशत मिटवण्यासाठी निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. शिट्टी विधानसभेत वाजणारच आहे . शिरूर मधून चांगली आघाडी मिळणार आहे. शिट्टी चिन्हाला वातावरण चांगले आहे. मला निवडून द्या, मी निवडून आल्यावर दादागिरी करणार नाही, दहा टक्के कमिशन घेणार नाही, मी कधी कोणावर अन्याय करणार नाही. माझ्यासारख्या माणसाला फसवणारा माणूस सर्वसामान्य लोकांना किती फसवत असेल याचा तुम्ही विचार करून मतदान करा. त्यांनी जलजिवन योजनेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. कुणालाही पाणी मिळाले नाही त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. कडा येथील सभेत, या निवडणुकीत मतदारांनी योग्य उमेदवार निवडवा असा संदेश आ. पंकजाताईं मुंडे यांनी दिला आहे.
निवडणूकीसाठी मतदार संघात अनेक गावात दहशत निर्माण करण्यासाठी बाहेरचे गुंड आणले आहेत. याबाबत मी पोलिसांना कळविले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कार्यकर्त्यांनो गुंडगिरीला घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत काही झाल्यास आम्हाला कळवा आमच्याकडे तालीम आहे पैलवान आहेत. मतदारांनी कसल्याही भूलथापाला बळी न पडता शिट्टी या चिन्हाला मतदान करून मला विधानसभेत पाठवण्याचे आवाहन शेवटी भीमराव धोंडे यांनी केले कार्यक्रमास दौलावडगाव परिसरातील वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?