अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकऱ्यांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी: धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वारकरी जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी घडली आहे.
सेलु तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिंडी चालली होती. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. ही दिंडी बुधवारी (दि.३) लाडनांद्रा येथुन निघाली. सदर दिंडी शुक्रवारी (दि.५) तेलगाव ता.धारुर कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती. दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश साळुंके, बालाजी सुरेवाड आदि घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.
What's Your Reaction?






