पायांना सूज कशामुळे येते?, जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीत पायांना सूज येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. पाय सूजल्यास रक्ताभिसरणात अडथळा येऊन अनेक समस्या निर्माण होतात; पण काही सोपे उपाय करून पायावरची सूज घालवता येते.

पायांना सूज कशामुळे येते?, जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीत पायांना सूज येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. पाय सूजल्यास रक्ताभिसरणात अडथळा येऊन अनेक समस्या निर्माण होतात; पण काही सोपे उपाय करून पायावरची सूज घालवता येते. (Swollen feet causes and treatments)

बर्‍याच जणांना पायावर सूज येते. यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रमुख कारण म्हणजे पोस्ट थ्रंबोटिक सिंड्रोम नावाचा शिरांचा आजार. यामध्ये पायांच्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. यामुळे रक्ताभिसरणाला अडथळा निर्माण होतो. पोटर्‍या आणि पावलांच्या शिरांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यावेळी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पावलांवर सूज येण्याचे आणखी एक कारण म्हणजे लिंफिडिमा हे होय. यामध्ये जंतू संसर्ग, जुनी जखम किंवा कर्करोगासारख्या रोगांमुळे पायातील लिंफोटिक वाहिनी काम करणे थांबवते. काही वेळा पोटाचे, जांघेचे ऑपरेशन झाल्यास पायांवर सूज येते.

पायांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारे माध्यम म्हणजे रक्त होय. लिंफमुळे पायांचा संसर्ग होण्यापासून बचाव होतो. लिंफ वाहून नेणार्‍या नलिकांमध्ये अडथळा आल्यानंतर लिंफ पायातच साठू लागते आणि त्यामुळे पायांवर सूज येते. सी.व्ही.आय. या रोगामुळेही पाय सुजतात. शुद्ध रक्ताचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे पाय सुजतात. कारण, दूषित रक्त एकाच ठिकाणी साठते. तासन्तास पाय लटकवून संगणकावर काम करणार्‍यांच्या पायाला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे पायाला शुद्ध रक्तपुरवठा होत नाही. तसेच किडनीचे रोग, हृदयरोग, शरीरातील प्रोटिनची कमतरता यामुळे ही समस्या उद्भवू शकते. थायरॉईडच्या आजारातही पायाला सूज येते, तर रक्तदाबासाठी घेण्यात येणार्‍या काही औषधांमुळे सूज येऊ शकते.

कारणे अनेक असली, तरीही पायांवर सूज येत असल्यास त्यांची योग्य तपासणी करून घ्यावी. तज्ज्ञ व्यक्तीकडून पायाचे सिटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या करून घेणेही काहीवेळा गरेजेचे असते. पाय सुजलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची शक्यतो गरज नसतेे. औषधे, फिजिओथेरपी आणि इतर उपचारांच्या मदतीने सूज दूर करता येते; मात्र काही वेळेला व्हेन्स बायपास सर्जरी किंवा तत्सम शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते.

ज्या रुग्णांच्या पायाला सूज येत असेल अशांनी काही बाबतीत काळजी घ्यावी. पायाभोवती आणि कंबरेभोवती तंग कपडे घालू नयेत. उंच टाचांचे बूट किंवा सॅण्डल अजिबात वापरू नयेत. सपाट टाचेच्या पादत्राणांमुळे पायांचे स्नायू क्रियाशील राहण्यास मदत मिळते. जॉगिंग, एरोबिक यासारखे व्यायाम करताना पायावर फार ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी. फार वेळ बसून राहावे लागत असेल किंवा उभ्याने जास्त वेळ काम करावे लागत असेल, तर अशा स्थितीत जास्त वेळ राहू नका. अधूनमधून फेर्‍या मारा, पायांची हालचाल करा, खाण्यात कमी उष्मांक असलेले आणि भरपूर फायबर असलेले पदार्थ खावेत. आहारात तेला-तुपाचा वापर कमी असावा. महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रित ठेवा. त्यामुळे शिरांवर अतिरिक्त येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. रोज सकाळी नियमितपणे फिरावयास जावे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow