संभाजी भिडे यांच्यावर कारवाई कधी होणार! काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही अशी वायफळ बडबड करुन स्वांतत्र्य व राष्ट्रगिताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी होत आहे पण राज्यातील सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. संभाजी भिडे यांनी केलेले विधान देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग व बलिदान करणाऱ्यांचा घोर अपमान करणारे आहे. भारताच्या स्वातंत्र्यालाच नाकारणाऱ्या संभाजी भिडेंचे विधान देशद्रोही आहे, या भिडेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्यास शिंदे-फडणवीस सरकार टाळाटाळ का करत आहे? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
भारताचे स्वातंत्र्य, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, व राष्ट्रगिताला न माननारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या विचाराचे पाठीराखे लोक सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचा अपमान करत असतात. काहींना तर देशाला स्वातंत्र्य २०१४ सालीच मिळाले असे वाटते, असे लोक देशद्रोही आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे पण संभाजी भिडे हे संघ विचाराची री ओढत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही उलट विरोधी पक्षांच्या लोकांना क्षुल्लक कारणावरूनही अटक केली जाते. राज्यात भाजपा विचारधारेच्या लोकांना एक कायदा व विरोधी पक्षांच्या लोकांना वेगळा कायदा आहे असे दिसते.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत पण गृहमंत्री फडणवीस यांना त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये धमक दिसत नाही. स्वांतत्र्य, तिरंगा व राष्ट्रगिताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेचा तीव्र निषेध करतो व सरकार भिडेंच्या देशविरोधी विधानाची दखल घेऊन कारवाई करेल अशी अपेक्षा करतो असे राजहंस म्हणाले.
What's Your Reaction?






