भाजपा सरकार अडीच लाख रिक्त पदे कधी भरणार ?काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
मुंबई प्रतिनिधी :- सरकारी नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय रद्द करताना त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडणारे भाजपा सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. भाजपा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील तरुणांना नोकरीपासून वंचित ठेवून केवळ राजकारण करत आहेत. राज्यात तब्बल २.५ लाख पदे रिक्त आहेत पण भाजपा सरकार ही रिक्त पदे भरत नाही. या रिक्त पदांची भरती कधी करणार? हे देवेंद्र फडणवीस व भाजपा सरकारने जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
कंत्राटी पद्धतीने सरकारे पदे भरण्याचा डाव भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या अंगलट आल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना खरे खोटे हे चांगले समजते. २०१४ पासून भाजपा सरकार नोकर भरती करण्यास टाळाटाळ करत आहे. शिक्षकांच्या ७० हजार जागा रिक्त आहेत, आरोग्य विभागात २५ हजार, गृह विभागात ५७ हजार, जलसंपदा विभागात २१ हजार जागा रिक्त आहेत. शासनाच्या विविध विभागातही हजारो जागा रिक्त आहेत या जागा भरण्याऐवजी भाजपा सरकार या सर्व जागा खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी पद्धतीने भरणार होते. आरोग्य विभागात कर्मचारी नसल्याने विविध शासकीय रुग्णालयात नवजात शिशुसह 100 जण मरण पावले पण भाजपा सरकारला जाग आली नाही. तलाठी परिक्षांमध्ये पेपर घोटाळा करुन तरुणांच्या भविष्याशी खेळ केला. ज्या 10 खाजगी कंपन्याकडून कंत्राटी नोकर भरती होणार होती त्या तर भाजपाच्या बगलबच्यांच्याच होत्या. फडणवीस कितीही आवेशाने बोलले तरी खोटारडेपणा लपत नाही.
कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातील आहे म्हणून भाजपा व फडणवीस जबाबदारी झटकू शकत नाहीत. काँग्रेस सरकारचा निर्णय होता तर तो आतापर्यंत रद्द का केला नाही? काँग्रेस व मविआ सरकारच्या काळातील योजनांना स्थगिती देता, काँग्रेस सरकारच्या योजनांचा निधी कपात करता तर फडणवीसांना काँग्रेस सरकारचा कंत्राटी भरतीचा जीआरच कसा काय दिसला नाही ? आता पितळ उघडे पडले हे लक्षात आल्यानेच फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे खोटी व अर्धवट माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण "देवेंद्र बाबू, ये पब्लिक है, ये सब जानती है"!. असा टोलाही राजहंस यांनी लगावला.
What's Your Reaction?