जालन्यातील मराठा बांधवांवर लाठी चार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? सुरेशचंद्र राजहंस

मुंबई, दि. २ सप्टेंबर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. आम्ही राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध करतो. जालन्यातील मराठा बंधू भगिनींवर लाठीहल्ला करण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
आघाडी सरकारने २०१४ साली मराठा समाजाला आरक्षण दिले होते परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले होते. तेव्हापासून हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक कायदेशीर प्रयत्न झाले परंतु केंद्रातील भाजपा सरकारने यामध्ये कोणतेही सहकार्य केले नाही. राज्यातील भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षातील कोणत्याही नेत्याने यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला नाही हे वास्तव असताना राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडून आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत येताच एका महिन्यात मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. एक वर्ष होऊन गेले अजून आरक्षण दिलेले नाही. फडणवीस केवळ थापेबाजी करतात.
आरक्षणाच्या विरोधात आरएसएस, भाजपा आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाकडून घेतली जात असलेली भूमिका, आंदोलनकर्त्यावर अमानुष पद्धतीने केला जाणारा लाठीचार्ज, त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने केली जाणारी बेताल आणि आरक्षण विरोधी वक्तव्य त्याचीच उदाहरण आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारची ही राजकीय चाल वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या समाजाने दाखवावी असे आवाहन राजहंस यांनी केले आहे.
What's Your Reaction?






