मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला. सुनील कावळे (45 वर्ष)असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली असून या नोटमध्ये 24 ऑक्टोबरला मराठा समाजाला मुंबईत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मूळची अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
सुनील बाबुराव कावळे यांच्या बॅगमध्ये पोलिसांना मोबाईला फोन आणि एक सुसाईड नोट सापडली आहे. नोटमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाकरता मराठा समाजातील 24 ऑक्टोबरला रोजी मुंबईमध्ये एकत्रित होण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे.
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही.
What's Your Reaction?






