भामा आसखेड धरणात 8.14 टीएमसी साठा

खेडच्या भामा आसखेड धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने धरणातून सोडण्यात आलेला पाणी विसर्ग बंद करण्यात आला.

भामा आसखेड धरणात 8.14 टीएमसी साठा

 खेडच्या भामा आसखेड धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने धरणातून सोडण्यात आलेला पाणी विसर्ग बंद करण्यात आला. धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले असून, धरणात सध्या 8.14 टीएमसी पाणीसाठा आहे. 1 जूनपासून आतापर्यंत पाणलोट क्षेत्र परिसरात 813 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदाच्या भामा आसखेड धरण जलसिंचन व्यवस्थापन उपविभागात झाली आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहिरे गावच्या भामा नदीवर भामा आसखेड धरण प्रकल्प 8.14 टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा आहे. या धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या तालुक्यांतील नदीकाठच्या शेतीला व गावच्या पाणी योजना तसेच पुणे महानगरपालिकेचा पूर्ण भाग, आळंदी शहर व खेड एमआयडीसी आणि तालुक्यातील 19 गावांना होतो. यामुळे धरण 100 टक्के भरणे खूप गरजेचे होते.

पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने 25 सप्टेंबर रोजी धरण काठोकाठ भरून ओव्होरफ्लो झाल्याने 26 सप्टेंबरपासून सांडव्याद्वारे प्रथम 620 व त्यानंतर 1226, 1828, 1516, 3031, 2435 आणि शेवटी 3616 क्यूसेकने विसर्ग भामा नदीपात्रात वेळोवेळी कमी-जास्त करून सोडला होता. पाऊस जसा कमी-जास्त होत होता, त्याप्रमाणे विसर्गदेखील सोडला जात होता. भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस आता थांबला आहे. त्यामुळे धरण सांडव्याद्वारे सोडण्यात आलेला विसर्ग मंगळवारी (दि. 3) बंद करण्यात आला. भामा आसखेड धरण जलसिंचन व्यवस्थापन उपविभाग प्रशासनाने नियोजनानुसार धरणात 100 टक्के पाणीसाठा करून ठेवला आहे.

भामा आसखेडमधील पाणीसाठा

एकूण पातळी- 671.50 मीटर
एकूण साठा- 230.647 दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीसाठा- 217.125 दशलक्ष घनमीटर
पाणीसाठा टीएमसीमध्ये- 8.14
आतापर्यंत झालेला पाऊस- 813 मि.मी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow