साईंच्या शिर्डीत हे काय चाललंय? पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, १५ तरुणींची सुटका

ज्या शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक अनेक हॉटेलवर छापे टाकले. यामध्ये १५ मुलींची सुटका करण्यात आली असून ११ आरोपींनी अटक करण्यात आली. भाविकांच्या निवासाची सोय म्हणून चालविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हे प्रकार सुरू होते. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेकांनी हॉटेल बंद केली.
श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शिर्डीत अनेक हॉटेलमध्ये अशा प्रकारे अनैतिक व्यवसाय चालत असल्याची माहिती मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री पोलिसांनी सापळे रचून हॉटेलवर कारवाई सुरू केली. जेथून माहिती मिळाली होती, अशा सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. मिळालेली माहिती खरी निघाली. या सहा ठिकाणी मिळून ११ आरोपींना अटक करण्यात आली. तेथून १५ मुली आणि महिलांची सुटका करण्यात आली.
कारवाईची माहिती मिळताच जेथे असे प्रकार सुरू होते, ती हॉटेल बंद झाली. त्यामुळे पोलिसांनाही मोहीम आटोपती घ्यावी लागली. शिर्डीत अन्य प्रकारची गुन्हेगारी वाढल्याच्या तक्रारी नेहमी केल्या जातात. त्यावर कारवाईही होते. मात्र, अशा प्रकारचे धंदेही शिर्डीत सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय ओळख असलेले तीर्थक्षेत्र शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंग व्यवसाय चालतो.
करोनाच्या काळात व्यवसाय बंद पडल्याने या व्यावसायिकांसंबंधी सहानुभूती निर्माण झाली होती. विमानसेवा आणि रस्ते वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्याने शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याचीही चर्चा असते. अशातच आता या हॉटेलमध्ये असे अवैध धंदे सुरू आल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांकडून येथे कारवाई होत नाही. त्यामुळे हे व्यवसाय वाढत आहेत. मिटके यांच्या पथकाने येथे येऊन धाडसाने कारवाई केल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






