मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्ला: "मला संपवणे सोपे नाही"

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जोरदार आंदोलनाची हाक दिली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळवंडी येथे घेतलेल्या घोंगडी बैठकीतून त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. "सरकारने मला संपवण्याचे ठरवले आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांना हे समजले पाहिजे की मला संपवणे सोपे नाही. मी काही सामान्य माणूस नाही," असे आव्हानात्मक वक्तव्य त्यांनी केले.
ऐकू कमी येत असेल तर आजच व्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक ला भेट द्या
9112717179 | 9657 588 677
मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाची हाक
मनोज जरांगेंनी १७ सप्टेंबरला शेवटचे आणि कठोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. "सरकारने १७ तारखेपूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा हे उपोषण अत्यंत कठोर आणि निर्णायक असेल," असा इशारा त्यांनी दिला. जरांगे यांनी मराठा समाजाच्या बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. "तुम्ही आम्हाला आरक्षण दिले नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला खुर्ची मिळणार नाही," असा ठाम इशारा त्यांनी दिला.
फडणवीसांवर गंभीर आरोप
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, "फडणवीसांनी आंदोलनात फूट पाडण्यासाठी पैसे दिले आणि लोक पाठवले. पण येणाऱ्या विधानसभेत आम्ही त्यांची ताकद दाखवून देऊ. पाच हजारांच्या लीडला तोंडाला फेस येईल अशी लढाई लढू," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भावनिक भाषणातून मराठा समाजाला साद
मनोज जरांगेंनी त्यांच्या भाषणातून मराठा समाजाला भावनिक साद घातली. "मराठ्यांची लेकरं दिवसाढवळ्या आत्महत्या करत आहेत, हे सरकारला दिसत नाही का? आम्ही हे अन्याय सहन करू शकत नाही. आता आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही," असे त्यांनी ठणकावले.
निवडणुकांपूर्वी आरक्षणाची मागणी
जरांगे यांनी आगामी निवडणुकांपूर्वीच आरक्षणाची मागणी करत सांगितले की, "निवडणुका झाल्यानंतर कोणी आपल्याला विचारणार नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच आरक्षण मिळवणे गरजेचे आहे."
सरकारविरोधात निर्धार
"सरकारने कितीही योजना केल्या, पैसे वाटले तरी मी लढणारच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहीन," असे म्हणत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले.
What's Your Reaction?






