पिंप्रीत रुग्ण वेटिंगवर!
गेल्या 17 दिवसांपासून माझ्या कमरेतील खुब्याची शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही. सध्या डॉक्टर फक्त गोळ्या-औषधे देत आहेत. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण त्यासाठी रुग्णालयाकडून दिले जात आहे. असा अनुभव महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एका रुग्णाने दैनिक पुढारीसमवेत बोलताना सांगितला. नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या रुग्णांच्या …
पिंपरी : गेल्या 17 दिवसांपासून माझ्या कमरेतील खुब्याची शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही. सध्या डॉक्टर फक्त गोळ्या-औषधे देत आहेत. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण त्यासाठी रुग्णालयाकडून दिले जात आहे. असा अनुभव महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एका रुग्णाने दैनिक पुढारीसमवेत बोलताना सांगितला.
नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णसेवेची काय परिस्थिती याची दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
त्याप्रसंगी रुग्ण संपत रनमोडे यांनी कमरेतील खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी होत असलेल्या विलंबाबाबत माहिती दिली. त्यांच्या पत्नी स्वाती रनमोडे म्हणाल्या की, सध्या माझ्या पतीला केवळ गोळ्या-औषधे दिली जात आहेत. आम्ही वालचंदनगर (ता. इंदापूर) येथून उपचारासाठी आलो आहोत. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण देत गेल्या 17 दिवसांपासून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.
सीटी स्कॅनसाठी थेरगाव रुग्णालयाचा रस्ता
वायसीएम रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन सध्या बंद अवस्थेत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून नवीन मशीन बसविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे मशीन सुरू होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या रुग्णांना नवीन थेरगाव रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी जाण्यास सांगितले जात आहे. काही रुग्णांना वेळेअभावी खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन सीटी स्कॅन करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा त्यासाठी अधिकचा खर्च होत आहे.
रुग्णालयावर जाणवतोय ताण
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची क्षमता 750 खाटांची आहे. या रुग्णालयात विविध वैद्यकीय सुविधांची सोय असल्याने येथे पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्हा आणि बाहेरुनही रुग्ण उपचारासाठी येतात. महापालिकेने नव्याने आकुर्डी, पिंपरी, थेरगाव, भोसरी आदी ठिकाणी रुग्णालये सुरू केलेली आहेत. वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी व्हावा, हा प्रमुख उद्देश त्यामागे होता. मात्र, अद्यापही वायसीएम रुग्णालयात रुग्णसेवेचा ताण जाणवत आहे.
What's Your Reaction?