मावळात काय... साहेब की दादा? नेत्यांचे वेट अँड वॉच

गणेश विनोदे वडगाव मावळ(पुणे) : राज्यात घडलेल्या सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचा परिणाम मावळ तालुक्यावरही झाला आहे. मावळातील नेते साहेबांबरोबर जायचे की दादांबरोबर जायचे याबाबत निर्णय घेताना वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत. तर, कार्यकर्ते व्हायबल असल्याचे दिसते. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी एकसंध राहणार की उभी फूट पडणार हा प्रश्नच आहे. तालुक्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये टोकाचा राजकीय … The post मावळात काय... साहेब की दादा? नेत्यांचे वेट अँड वॉच appeared first on पुढारी.

मावळात काय... साहेब की दादा? नेत्यांचे वेट अँड वॉच

गणेश विनोदे

वडगाव मावळ(पुणे) : राज्यात घडलेल्या सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचा परिणाम मावळ तालुक्यावरही झाला आहे. मावळातील नेते साहेबांबरोबर जायचे की दादांबरोबर जायचे याबाबत निर्णय घेताना वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत. तर, कार्यकर्ते व्हायबल असल्याचे दिसते. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी एकसंध राहणार की उभी फूट पडणार हा प्रश्नच आहे.

तालुक्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष

पूर्वीपासून जनसंघ-काँग्रेस, भाजप-काँग्रेस तर गेल्या 25 वर्षांपासून भाजप-राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष असलेल्या मावळ तालुक्यात तब्बल 25 वर्षांनी सत्तांतर घडले आणि आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने मावळमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली. सद्यस्थितीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी व भाजप असा टोकाचा राजकीय संघर्ष असून ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी गावकी, भावकीत टोकाचे वाद करून पक्षाला व पक्षनेत्यांना साथ दिली आणि आता अचानक हे वाद बाजूला सारून एकत्र बसायची वेळ आली आहे.

चार वर्षांपासून राष्ट्रवादीला आले सुगीचे दिवस

वास्तविक सातत्याने संघर्ष करावा लागणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला चार वर्षांपासून सुगीचे दिवस आले. पक्षांतर्गत गटबाजीही काही प्रमाणात कमी झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही उत्साह आला होता. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल अशी खात्री निर्माण झाल्याने इच्छुकांनीही जोर लावला होता. पक्ष संघटनेचे कामही जोमात सुरू होते. त्यामुळे पक्षाला स्थापनेनंतर पहिल्यांदाच खर्‍या अर्थाने अच्छे दिन आले होते. असे असताना रविवारी राज्य पातळीवर अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर झाला आहे. तालुक्यातील सत्ता बदलामध्ये अजित पवारांनी घेतलेली निर्णयात्मक भूमिका व गेल्या चार वर्षांत तालुक्याच्या विकासासाठी अजित पवारांमुळे मिळालेला भरघोस निधी तसेच आगामी काळात रखडलेली कामे व उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असणारा निधी यासाठी सत्तेची गरज लक्षात घेऊन आमदार शेळके यांनी लागलीच अजित पवार यांना साथ दिली.

तालुक्यातील अनेक नेत्यांची भूमिका गुलदस्तात

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांना मानणारे व त्यांच्याशी थेट संबंध असणारे असे अनेक नेते असून यामध्ये आमदार शेळके यांच्यासह माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, गणेश ढोरे, बाबूराव वायकर तसेच काही प्रमुख कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. परंतु, आमदार शेळके यांच्या व्यतिरिक्त अद्याप इतर कोणीही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली दिसत नाही. काही नेत्यांचा शरद पवार यांच्याकडे तर काही नेत्यांचा अजित पवार यांच्याकडे कल असल्याचे दिसते. त्यामुळे या सर्वांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत मावळात राष्ट्रवादी एकसंध राहणार की राष्ट्रवादीत फूट पडणार हे स्पष्ट होणार नाही.

म्हणून.. भाजपही अस्वस्थ !

एक वर्षांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर अक्टिव्ह मोडवर आलेल्या मावळ भाजपला सत्तेच्या नव्या समीकरणामुळे धक्का बसला आहे. सातत्याने राष्ट्रवादीशी व आमदार शेळके यांच्याशी संघर्ष करत आलो असताना आता एकत्र काम कसे करायचे यापेक्षा सत्तेत आल्यामुळे आमदार शेळके यांचे वजन पुन्हा वाढणार आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचे दिसते.

तर इच्छुकही होतील सैरभैर !

राष्ट्रवादीला तालुक्यात चांगले दिवस आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या आशा वाढल्या होत्या. त्यानुसार अनेकांनी लाखो रुपये खर्चही केले, निवडणुका लांबल्याने थंडावले असले तरी निवडणुका लागल्या की पुन्हा जोर धरतील. परंतु, पक्षातच विभागणी झाली तर संबंधित इच्छुकही सैरभैर होण्याची शक्यता आहे.

 

The post मावळात काय... साहेब की दादा? नेत्यांचे वेट अँड वॉच appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow